फ्रान्समधील अधिकृत दौरा आटोपून भारतात परतताना दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने रोखल्याच्या वादग्रस्त प्रकरणावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अखेर मौन सोडले आहे. “मला विमानतळावर सुमारे दोन तास बसवून ठेवण्यात आले. सामानाची तपासणी करायची असल्याचे कारण कस्टम अधिकाऱ्यांनी दिले, मात्र तपासणीअंती सामानातून काहीही आक्षेपार्ह निघाले नाही,” असा थेट खुलासा मुख्यमंत्री मान यांनी शुक्रवारी केला.
हा प्रकार तुमचा मानसिक छळ आहे का, असा सवाल विचारला असता मान यांनी खळबळजनक दावा केला. “दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागाचे प्रमुख हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे सख्खे बंधू मनीष कुमार आहेत. त्यांनी अडविले. त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा ते असा राजकीय सूड उगवत असतात.”, असा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणावरून आम आदमी पार्टीने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘आप’ने २० ऑक्टोबर रोजी दावा केला होता की, पॅरिसवरून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर मुख्यमंत्री मान यांना तब्बल तीन तास ताटकळत ठेवण्यात आले आणि त्यांचा ५० हजार रुपयांचा दंड (चालान) फाडण्यात आले. पंजाब आपचे मीडिया प्रभारी बलतेज पन्नू यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे सामान तपासणीनंतर वाहनात चढवले जात असतानाच कस्टम अधिकाऱ्यांनी ‘वरिष्ठ पातळीवरून प्रचंड दबाव आहे’ असे सांगत अचानक दंड जारी केला. आपने किंवा मान यांनी हा दंड का आकारला हे अद्याप सांगितलेले नाही.

