तपासणी करत असलेल्या महिला डॉक्टरवर आरोपीने पोलिसांसमोरच हल्ला करून तिच्या कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना वर्धा जिह्यात घडली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात असलेल्या तळेगावमधील श्यामजी पंत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाच पोलीस कर्मचारी कादिर अली रज्जाक या आरोपीला कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन आले होते. तिथे डॉक्टर श्रद्धा भुमरे यांनी या आरोपीची वैद्यकीय तपासणी सुरू केली. ही वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच आरोपी कादिर अली रज्जाक याने संतापाच्या भरात डॉ. श्रद्धा भुमरे यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची सीसीटीव्ही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपीवर नियंत्रण मिळवले.
आरोपी कादिर अली रज्जाक हा स्थानिक रहिवासी असून, त्याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला आणि सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने महिला डॉक्टरावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे डॉक्टर आणि मेडिकल असोशिएशनमध्ये संतापाचं वातावरण आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

