बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील एका मोठ्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवहारादरम्यान मध्यस्थाला एका लॉजवर डांबून ठेवून मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भिगवण येथील व्यावसायिक अमित मुरलीधर दराडे यांनी याप्रकरणी थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्ज देत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे बारामती आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

असा ठरला होता व्यवहाराचा आकडा

अमित दराडे यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या सविस्तर अर्जानुसार, दिलीप कोंडिबा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी वाघळवाडी येथील रस्त्यालगतचा एक प्लॉट विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानुसार दराडे यांनी माळेगाव येथील त्यांच्या ओळखीच्या सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

या प्रकरणाची प्राथमिक बैठक पुण्यातील बाणेर येथील खेडकर यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत १४ गुंठे क्षेत्राच्या या प्लॉटचा व्यवहार प्रति गुंठा १० लाख ७५ हजार रुपये या दराने ठरला. त्यानुसार संपूर्ण जमिनीची एकूण किंमत १ कोटी ५० लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली. प्राथमिक करार म्हणून २५ हजार रुपये इसारपोटी देण्यात आले, तर उर्वरित रक्कम १२ ऑक्टोबर रोजी बारामती येथे दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखताच्या वेळी देण्याचे ठरले होते.

लॉजवर बोलावून वादाची ठिणगी आणि पैसे ताब्यात

ठरल्यानुसार १२ ऑक्टोबर रोजी अमित दराडे आणि खरेदीदार जगदाळे हे बारामतीतील दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचले. त्याचदरम्यान मनोरमा खेडकर यांचा फोन आला आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी बारामती क्लब परिसरातील एका लॉजवर थांबलो असल्याचे सांगून त्यांना तेथे बोलावण्यात आले.

दराडे यांनी अर्जात नमूद केल्यानुसार, लॉजवर गेल्यानंतर चर्चा सुरू असताना रोख रक्कम मोजण्यासाठी मशीन आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर १ कोटी २५ लाख ५० हजार रुपये इतकी मोठी रक्कम मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि त्यांचे व्यवस्थापक बाळराजे खेडकर यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली.

कागदपत्रांवर सक्ती आणि मारहाणीचा आरोप

रक्कम ताब्यात घेतल्यावर प्रकरण वळण बदलले. दराडे यांना एका खोलीत बोलावून कागदपत्रांच्या आधारे दबाव आणण्यास सुरुवात झाली. संबंधित प्लॉटवर आधीच फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत, ठरलेली संपूर्ण रक्कम नाकारण्यास किंवा केवळ १८ लाख रुपयांचेच कागदपत्र करून देण्यास त्यांना भाग पाडण्यात आले, असा गंभीर आरोप आहे.

जेव्हा या मनमानी कारभाराला आणि रकमेवरून वाद घालण्यात आला, तब दराडे यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध खोलीत डांबून ठेवण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना शारीरिक मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या एका अन्य गुन्ह्याचा संदर्भ देत त्यातील कागदपत्रांचा धाक दाखवून हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे अर्जात म्हटले आहे. या वादानंतर दराडे यांना केवळ ३ लाख रुपये परत करण्यात आले.

पोलिसांत धाव

या जीवघेण्या आणि मनस्ताप देणाऱ्या घटनेनंतर अमित दराडे यांनी तातडीने पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत अर्ज सादर करून न्याय मिळवून देण्याची आणि संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे व्यावसायिक आणि मध्यस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading spinner