महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावले होते. त्यांच्याकडून काही माहिती आली आहे, काही माहिती पुढील १० दिवसांत माझ्याकडे येईल. ही माहिती आली की, दिवाळीनंतर महाराष्ट्राचा माझा दौरा आखला जाईल. या परिस्थितीवर राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे, याची मला कल्पना नाही. परंतु, पक्षातर्फे जे काही करता येईल, ते पाहिले जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, गेली २० वर्ष मराठवाड्याबाबत एक गोष्ट मी सांगत आलो की, पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, पाणी वेडेवाकडे वापरले गेले की, माझ्याकडे तो रिपोर्टही आहे. आत्ता लक्ष दिले गेले नाही, तर मराठवाड्याचे वाळवंट होईल. मराठवाड्याला पूर्ववत करायचे असेल, तर अडीचशे ते पाऊणे तीनशे वर्ष लागतील. तिथे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करत आहेत. कोणी बोरवेल खणत आहे, कसलीही परवानगी घेत नाहीत. बेकायदा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बिअरचे कारखाने सुरू आहेत. कुणीही विहिरीतून पाणी काढत आहे आणि विकले जात आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

Loading spinner