राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या पॅनेलने १३ विरुद्ध १२ असा निसटता पण अत्यंत महत्त्वपूर्ण विजय मिळवत सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. या विजयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
“गोकुळ दूध संघातील सतेज पाटील यांचा हा विजय म्हणजेच राज्यातील ‘रेजीम चेंज’ (सत्ता परिवर्तन) ची सुरुवात आहे. जगात कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
महायुतीचे दिग्गज पराभूत
या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महायुतीच्या पॅनेलला धोबीपछाड दिला. या पराभवामुळे महायुतीला मोठा राजकीय फटका बसला आहे. पराभूत झालेल्यांमध्ये:
-
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र व गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ
-
माजी अध्यक्ष विश्वास पाटील
-
माजी अध्यक्ष अरुण डोंगळे
-
भाजप नेत्या शौमिका महाडिक
यांच्यासह महायुतीच्या तब्बल १२ दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निकालामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रासह राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळाली आहे.
मोहन भागवत यांच्या भूमिकेचे राऊतांकडून स्वागत
दरम्यान, राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले. संघाच्या मंचावरून मांडण्यात आलेले विचार आणि देशातील सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

