अशोक खरात या भोंदूबाबाच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता नाशिकमधून भोंदूगिरीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारपण बरे करण्याच्या आणि दैवी शक्तींच्या जोरावर घरात पैशांचा पाऊस पाडण्याच्या खोट्या आमिषाने एका महिलेची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कथित भोंदूबाबा अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील एक महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्य अस्थमाच्या (दमा) आजाराने त्रस्त होते. तसेच कुटुंबात आर्थिक अडचणीही सुरू होत्या. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपी अरुण धोंडू पाटील याने त्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. कुटुंबाचा आजार पूर्णपणे बरा करण्याचे आणि दैवी शक्तींच्या माध्यमातून घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन त्याने दिले.
अघोरी पूजा आणि फसवणूक
अंधश्रद्धेच्या नावाखाली आरोपीने हद्दच पार केली. पीडित महिलेला चक्क अर्धनग्न अवस्थेत बसवून त्याने घरात अघोरी पूजा घातल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पूजेदरम्यान मानवी कवटी, हळद, कुंकू आणि विविध पूजेच्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. पैशांच्या पावसाच्या वेगवेगळ्या तीन पूजाविधींच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलेकडून तब्बल ५ लाख आणि नंतर आणखी रक्कम मिळून एकूण ७ लाख ५० हजार रुपये उकळले.
अंनिसच्या मध्यस्थीने पोलिसांत कारवाई
पैसे देऊनही महिलेचा आजार बरा झाला नाही आणि घरात पैशांचा पाऊसही पडला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी’ संपर्क साधला.
अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर गंगापूर पोलिसांनी संशयित आरोपी अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीची बाजू आणि पोलिसांचे आवाहन
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अरुण पाटील याने एक व्हिडिओ जारी करून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी संबंधित महिलांना ओळखत नाही, माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे,” असा दावा त्याने केला आहे.
दरम्यान, या भोंदूबाबाकडून अशाच प्रकारे इतरही नागरिकांची फसवणूक झाली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडलेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

