
मनमाड ः- शहरातील भारत नगर येथील 20 वर्षीय तरूण ओम धनवटे हा तीन दिवसापासून बेपत्ता होता. शहर पोलिस ठाण्यात त्याबाबत मिसिंगची नोंदही करण्यात आली. त्याचा शोध सुरू असतांना मनमाड रेल्वे स्थानकाजवळील महादेव बंधार्यात त्याचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ओम याने आत्महत्या केली की अन्य काही प्रकार आहे याबाबत पोलिस आता तपास करीत आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या भारत नगर भागात ओम धनवटे, वय 20 हा तरूण राहतो. तीन दिवसापूर्वी शहरातील एका दुकानात रविवारी सकाळी तो काही कामासाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराने शोध मोहिम सुरू केली पण तो सापडला नाही. अखेर मनमाड शहर पोलिस स्थानकांत ओम हा मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास रेल्वेला पाणी पुरवठा करणार्या महादेव बंधार्यात या तरूणाचा मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवचिकित्सेसाठी आणला.
ओम धनवटे याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्याला कोणतेही व्यसन नव्हते. रविवारी त्याचा पगार देखील झाला. रात्री कामावरून घरी येत असतांना त्याने फ ोन पे द्वारे एक पेमेंट मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पाठविल्याचे मोबाईलवर दाखविण्यात येत आहे. नेमका हा प्रकार ऑनलाईनशी संबंधित आहे कां? याचीही चर्चा शहरात आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.