
मुंबई ः- हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्या यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. शासनाने ही मागणी मान्य केली आहे.
गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलदगतीने मान्यता देण्यात येईल.मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार.
रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करणार – जरांगे
सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर तत्काळ काढला, तर रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचा शब्द मनोज जरांगे यांनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला.
मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो. मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील. एक तासात सर्व जीआर काढा आणि आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर अंतिम निर्णय सांगू. सरकारने एकूण 3 जीआर काढावेत. सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा. सर्वकाही सुरळीत झाले तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील.
मराठा – कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला 2 महिन्यांची मुदत
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा व कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, आम्ही सरकारकडे 58 लाख नोंदींच्या आधारावर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने हा मुद्दा क्लिष्ट असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागितला. त्यानुसार आम्ही त्यांना ही मुदत दिली. या मुदतीनंतर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढला जाईल.
सप्टेंबर अखेरपर्यंत गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल – जरांगे
जरांगे म्हणाले, सगेसोयर्यांच्या मुद्यावरही आमची चर्चा झाली. महाष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्याची विनंती आम्ही केली होती. सरकारने विविध ठिकाणचे गुन्हे मागे घेतलेत. उर्वरित ठिकाणचे गुन्हे कोर्टात जाऊन मागे घेण्यात येतील. या प्रकरणाची कारवाई सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल. सरकारने याविषयी आम्हाला लेखी हमी दिली आहे. ही गोष्ट जीआरमध्येही येईल.