
जनश्रध्दा न्यूज नेटवर्क
मनमाड (सॅमसन आव्हाड)ः- मनमाड शहरात मोकाट जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच छोटे-मोठे अपघात ही नेहमीचाच त्रास नागरिकांना व वाहन चालकांना झाला आहे.
शहर परिसरातील या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना छोट्या मोठ्या अपघातांना व नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. आज दुपारी चार वाजता मनमाड शहरातील मुख्य रस्त्यावर रेल्वे स्टेशनसमोर दोन मोकाट बैलांमध्ये झुंज रंगली. यामुळे तेथील हॉटेल चालकांची आणि नागरिकांची मोठी धावपळ झाली. दोन्ही मोकाट सांड हॉटेलमध्ये घुसता घुसता वाचले. हॉटेल चालकांनी हॉटेलचे शटर बंद केले आणि रिक्षा स्टॅन्ड येथील चालकांनी आपली रिक्षा लागलीच दुसरीकडे नेल्यामुळे नुकसान होता होता वाचले. परंतु दोन्ही मोकाट सांड यांनी रेल्वे स्टेशन परिसरात आपला मोर्चा वळविल्याने तेथेही प्रवाशांची आणि नागरिकांची धावपळ झाली. नागरिक, प्रवाशी यांनी आपला जीव मुठीत घेऊन पळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर नगरपरिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून जोर धरू लागली आहे.