
मनमाड ः- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील सहा दिवसांच्या उपोषणानंतर शासनाने मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनला यश मिळाल्याबद्दल मनमाड शहर सकल मराठा समाज बांधव तसेच शिवसेना शिंदे गटातर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सायंकाळी फ टाक्यांच्या आतषबाजीत भव्य जल्लोष व आनंदोत्सव साजरा झाला.
यावेळी उत्साही मराठा समाज बांधव तसेच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे पाटलांचा विजय असो आदींसह विविध घोषणा देत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर घोषणा देत, नाचत पेढे वाटून व फ टाक्यांच्या आतषबाजीत सुमारे एक तास हा साजरा केला. समाज बांधवांच्या उत्साहाला उधाण आले होते. जरांगे पाटील यांचा विजय असो यासह विविध घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला. विविध पक्ष, कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधव सहभागी झाले.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर व आंदोलनानंतर अखेर सकल मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश आले. राज्य शासनानेही या उपोषणाची तातडीने योग्य ती दखल घेत समाजाच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल येथील मराठा समाजाचे प्रतिनिधी व शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी राज्य शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फ रहान खान, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, बबलु पाटील, सुनील हांडगे, नाना शिंदे, संजय कटारिया, स्वाती मगर, नितीन पाटील, योगेश जाधव, विठ्ठल नलावडे, पिंटू शिरसाठ, परेश राऊत, प्रमोद पाचोरकर, निलेश व्यवहारे, पप्पू परब, ललित रसाळ, अनिल देवरे आदींसह समाजबांधव व शिवसैनिक उपस्थित होते.