
प्रतिनिधी/मनमाड ः- एक मराठा, लाख मराठा, मराठा आरक्षणाचा गुलाल अंगावर घेऊनच परतणार, अशा आवेशपूर्ण घोषणा देत मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून गुरुवारी मनमाडसह नांदगाव, चांदवड, येवला आणि मालेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे मार्गस्थ झाले. या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून गेला होता.
गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकातून जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी मार्गस्थ झाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. जरांगे यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कुच सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर येथून असंख्य कार्यकर्ते आज मुंबईसाठी मार्गस्थ झाले. तसेच शुक्रवारी पंचवटी एक्सप्रेसने देखील हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार मराठा आरक्षणाचा गुलाल अंगावर घेऊनच आम्ही मुंबईतून परतणार आहोत. तसेच आरक्षणाचा थेट आदेश घेऊन येणार असल्याचा निर्धार केला. मनमाडमधूनही सकल मराठा समाज कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले. त्यांच्या विविध घोषणांनी रेल्वे स्टेशनचा परिसर दणाणून गेला. एक मराठा, लाख मराठा घोषणेने मराठा बांधवांनी रेल्वे स्टेशन दणाणून सोडले. मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा पाठिंबाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. आझाद मैदानावर होणार्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथून रेल्वेने सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.