मुंबई : बेस्ट कामगारांसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. बीडीडी चाळ, मुंबई पोलीस व डबेवाल्यांच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना घरे देण्यात येणार आहेत. बेस्टच्या २२ हजार कामगारांना ५०० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहेत. अवघ्या १५ लाखांत घर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन लाड यांनी यावेळी दिले. दि बेस्ट एम्प्लोईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची धुरा भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हाती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची पोलखोल करत निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, बेस्टच्या निवडणुकीत दोन ठाकरे एकत्र आले आहेत. सहकारात पक्ष आणू नये, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. परंतु ठाकरे बंधूचे सहकारात अस्तित्व शून्य आहे. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड व प्रविण दरेकर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेपाठोपाठ आता बेस्ट कामगारांच्या या पतपेढीची निवडणूक ही रंगतदार होताना पाहायला मिळणार आहे.
